काँग्रेसचा ‘जन आवाज’ प्रसिद्ध; बेरोजगारी, गरिबी, राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र धोरण यासह अनेक मुद्द्यांचा समावेश

Foto

नवी दिल्‍ली: काँग्रेस पक्षाने आज दिल्‍लीमध्ये पत्रकार परिषद आयोजित करत लोकसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला. ‘जन आवाज’ असे या जाहीरनाम्याला नाव देण्यात आले असून, बेरोजगारी, गरिबी, राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र धोरण यासह अनेक मुद्द्यांचा समावेश या जाहीरनाम्यात करण्यात आला आहे.
 
शेतकरी, दलित, महिला आणि तरूणांना जाहीरनाम्यात प्राधान्य देण्यात आले आहे. शेतकर्‍याने कर्ज न फेडल्यास फौजदारी गुन्हा ठरणार नाही, अशी मोठी घोषणा या जाहीरनाम्यात करण्यात आली आहे. सध्या देशात सातत्याने खोटे बोलले जात आहे;परंतु काँग्रेसने आज प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यातील कोणतीही खोटी घोषणा करण्यात आलेली नाही, असे म्हणत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर यावेळी घणाघाती टीका केली.
   जाहीरनामा प्रसिद्ध करताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह, पी. चिदंबरम, प्रवक्‍ते रणदीपसिंह सुरजेवाला यांच्यासह काँग्रेसचे दिग्गज नेते उपस्थित होते. काँग्रेसचा हा जाहीरनामा ‘जन आवाज’ या नावाने प्रसिद्ध करण्यात आला आहे. ‘हम निभाएंगे’ असे जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर आश्‍वासन देण्यात आले आहे.
  
सध्या देशात सातत्याने खोडे बोलले जात आहे, असा हल्‍लाबोल करत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर यावेळी घणाघाती टीका केली. गेल्या पाच वर्षांत मोदी सरकारने देशात फूट पाडण्याचे काम केले. मोदी सरकारच्या गेल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात देशात 4.70 कोटी नोकर्‍या गेल्या, असा आरोप करून राहुल गांधी म्हणाले, काँग्रेस सत्तेत आल्यास शेतकर्‍यांसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प मांडण्यात येईल. पंतप्रधान करणे हे देशातील जनतेचे काम आहे, पुढील पंतप्रधान जनताच ठरवेल.

मोदी यांनी लोकांना 15 लाख रूपये देणार असे म्हटले होते. मात्र मोदी सरकारने जनतेला खोटी आश्‍वासने दिली आहेत. आम्ही आमच्या जाहीरनाम्यात कोणतीही खोटी आश्‍वासने दिली नाहीत. ‘गरिबीवर वार, 72 हजार’ असे म्हणत राहुल गांधी यांनी मोदींसह भाजपवर निशाणा साधला आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात जनतेच्या ‘मन की बात’ असे म्हणत राहुल गांधी यांनी मोदी यांच्यावर निशाणा साधला. बेरोजगारी, शेतकर्‍यांच्या समस्या हे मुद्दे देशातील वास्तव आहेत. तसेच भ्रष्टाचार, राष्ट्रीय सुरक्षा या मुद्द्यांवर नरेंद्र मोदींनी थेट माझ्यांशी चर्चा करुन दाखवावी, असे आव्हानही त्यांनी दिले.

मोदींची आरोग्य योजना म्हणजे जनतेकडून पैसा घेऊन उद्योगपतींना देण्यासारखे आहे. जनतेच्या खात्यात सरकार किती रक्‍कम टाकू शकतो? याची मी माहिती घेतली. मोदींनी दोन कोटी रोजगाराचं खोटं आश्वासन दिलं. मी माझ्या समितीला विचारलं सत्य काय आहे? आम्ही 22 लाख रोजगार देऊ.10 लाख तरुणांना ग्रामपंचायतीत रोजगार उपलब्ध करुन देऊ, असे आश्‍वासन राहुल गांधी यांनी दिले.